27/09/2018
आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य गुंतवणूक
सध्याच्या काळात घर किंवा जमीन घेणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरत आहे. घर खरेदी केल्याने उत्तम गुंतवणूक होतेच; त्याचप्रमाणे पैसाही कारणी लागल्याचे समाधानही प्राप्त होते. मात्र जमीन किंवा घर घेणे ही सोपी बाब नाही. कारण, आपली आयुष्यभराची मिळकत घरावर खर्ची होणार असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे आवश्यक असते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार घरामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय कधीही तोट्यात जात नाही. कारण, आपल्याकडे राहत्या घराची उपलब्धता मागणीच्या तुलनेते नेहमीच कमी असते. लहान आणि मोठ्या शहरांमधील घरांच्या किमतीमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळतात. रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये आणखी तेजी येणार असल्याची तज्ज्ञांना अपेक्षा आहे. कारण, पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान गावांमध्येही गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. गावांचा आणि शहरांचा विकास सातत्याने होत असतो. त्यामुळे तेथील घरांच्या किंमतीही वाढतात आणि गुंतवणूकदारांनाही फायदा होतो. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात बरेचदा स्पष्ट चित्र तयार नसते.
याबाबत अँडी हेलरने आपल्या "वाय इव्हन लोअर द रेग्युलर पीपील गाईड टू रिअल इस्टेट रिचेस' या पुस्तकामध्ये चांगले मुद्दे मांडले आहेत. पुस्तकातील मुद्यांनुसार गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम गुंतवणुकीची योजना आखायला हवी. म्हणजेच खरेदी करायची स्थावर मालमत्ता भविष्यात किती फायद्याची ठरू शकेल याचा विचार करायला हवा. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एक काल्पनिक मॉडेल तयार करावे. त्यानुसार घराची शोधाशोध करता येते. कारण, एकदा घर घेतल्यानंतर निर्णय पुन्हा बदलता येत नाही आणि सुधारताही येत नाही. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण बऱ्याच चर्चा ऐकलेल्या असतात. त्यामुळे प्रॉपर्टीमधून लगेच चांगला परतावा मिळेल अशी आपली अपेक्षा असते. परंतु, चांगला परतावा
मिळण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते हे लक्षात ठेवायला हवे.
प्रॉपर्टी घेताना केवळ उडत्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला रिअल इस्टेट एजंट, होम इन्स्पेक्टर, वकील, बॅंक यांचा सल्ला घ्यावा. अन्यथा, उत्साहाच्या भरात एखादे घर खरेदी करताना आपण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे मोजतो आणि नंतर नुकसान सहन करावे लागते.
Ref: dailyhunt