30/06/2019
पाणीटंचाईवर उपाय म्हणून पुण्याच्या पिंपळे सौदागर मधल्या रोजलॅंड रेसिडेन्सी या सोसायटीने पावसाचं पाणी साठवण (Rainwater harvesting) प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाबाबत चेअरमन संतोष मसकर यांनी दिलेली ही माहिती.
"मुख्य समस्या-
रोजलॅंड ची स्थापना २००६ सालाची आहे, आमची सोसायटी (९८२ फ्लॅट्स, लोकसंख्या ३७००, ३४ इमारती). २००७ सालापासून सोसायटी ला पाण्याची समस्या यायला लागली आणि त्यातून मार्ग कसा काढायचा ह्यासाठी आम्ही वेगवेगळे पर्याय शोधायला सुरवात केली, तसे सोसायटी मध्ये जागेची कमतरता असल्यामुळे खड्डे घेणे जिकरीचे असते. शेवटी बोरवेल चे पुनर्भरण करणे हा एक मार्ग दिसला आणि टेरेस वर जमा होणारे पावसाचे पाणी फिल्टर द्वारा बोरवेल मध्ये सोडायला सुरवात केली आणि आम्हाला दुसऱ्या वर्षी ज्या बोरवेल मार्च मध्ये बंद होत होत्या त्या आताही पाणी देत आहेत आणि हेच आमच्या साठी प्रोत्साहन होते. त्यामुळे रोसेलॅन्ड मागच्या ९ वर्षांपासून टँकर फ्री सोसायटी आहे परंतु या वर्षी पाणी टंचाईमुळे आम्हाला टँकर्स ची मदत घ्यावी लागली. त्यामुळे आम्ही नवीन पर्याय शोधायला सुरुवात केली. पावसाच्या पाण्याची साठवण जास्तीत जास्त जमिनीत कशी करता येईन यासाठी प्रयत्न करायला लागलो.
उपाय -
1) भूजल पुनर्भरण ह्या पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीची आम्ही अंमलबजावणी केली. या पद्धतीमध्ये वाया जाणाऱ्या पावसाच्या अक्षरश: लाखो लिटर्स पाण्याला आपण जमिनीत जिरवून बचत करू शकतो. आम्ही इमारतींच्या/घरांच्या छतांवर पडून वाहून जाणारे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरवितो आहे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल आणि पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात पण बचत होईल.
2) आम्ही इमारतींच्या छतांवरचे पाणी गोळा करण्यासाठी आतापर्यंत २०० रेन वॉटर फिल्टर्स ची अंमलबजावणी केली आहे आणि हे पाणी पुढे बोरवेल रिचार्ज करण्यासाठी वापरतो. यामुळे पाण्याचा दर्जादेखील सुधारतो (आमच्या सोसायटी मध्ये आधी टीडीएस लेवल ५४० होते आणि आता जवळपास ३०० आहे). रेन वॉटर फिल्टर्स मध्ये आम्ही सुधारणा करत गेलो, आमच्या चुका मधून आम्ही शिकलो.
3) आम्ही ९०% घरांमध्ये वॉटर एरिएटर्स ची अंमलबजावणी केली. त्यामुळे जवळपास ३०%(दररोज १ लाख लिटर पाणी ) सोसायटी लेवलला पाणी बचत झाली. दर वर्षी सोसायटी मार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊन होणारी पाण्याची गळती सोसायटी मार्फत दुरुस्त केली जाते. आमचे रहिवासीपण अश्या गोष्टीला साथ देतात कारण हे काम एक चळवळ म्हणूनच केले पाहिजे. आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आपल्या हातात आहे याचा विश्वास आला की कोणतीही सोसायची एकजुटीने हे काम करू शकते. तुम्हीही आमच्या सोसायटीला भेट देऊन याबाबत अधिक माहिती घेऊ शकता."
Roseland Residency, Pimple saudagar, Pune