23/12/2022
कोयलिया बोले अंबुआ की डालपर…
माझ्या बागेतल्या आंब्याच्या झाडांपैकी एकाला फार नाही पण तुरळक मोहोर धरलाय. घरात सगळीकडे एक मंद तरीही मादक सुवास पसरलाय. गोव्यातही आता ठिकठिकाणी आम्रमंजिऱ्या फुलायला लागल्या असतील.
भारतात वसंत ऋतु येतो तो बरोबर आम्रमंजिऱ्यांचा दरवळ सोबत घेऊनच. किंबहुना म्हणूनच संस्कृत भाषेत आंब्याला मधू-दूत असेही नाव आहे. मधू म्हणजे मदन, कामदेव, वसंत ऋतूचा अनभिषीक्त सम्राट. मदनाचे धनुष्य इक्षुदंडाचे म्हणजे उसाच्या कांडीचे, त्याची प्रत्यंचा भ्रमरांनी सजवलेली आणि मदनाच्या भात्यातील बाणांची टोके फुलांनी सजवलेली. ती फुले सुद्धा कोणती, तर श्वेतकमल, नीलकमल, जाई, अशोक आणि आम्र मंजिरी. किती सुंदर कल्पना! अश्या ह्या पुष्पशरांनी भरलेला आपला भाता घेऊन मदन रतीसमवेत पोपटावरून जागोजागी विहरत असतो आणि तरुण स्त्री-पुरुषांवर आपल्या मदनबाणांचा वर्षाव करत असतो. म्हणून हा आम्रमंजिऱ्यांचा ऋतू वसंत म्हणजे प्रेमाचा ऋतू.
आंबा भारतात हजारो वर्षांपासून आहे. भारतात आंब्याची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचा पुरावा संस्कृत वाङ्मयातून मिळतो. म्हणूनच आंब्याची पाने, मोहोर, कैरी, लाकूड आणि पक्व फळ हिंदू धर्मकृत्यांमधून वापरतात. संस्कृतमध्ये आम्रवृक्षाची नावे तरी किती सुंदर आणि काव्यात्म! मदनाचा सहकारी म्हणून सहकारी, रसाने भरलेले फळ म्हणून रसाळ, वसंताच्या आगमनाची चाहूल घेऊन येणारा म्हणून मधुदूत किंवा वसंतदूत, कोकिळांचा आवडता वृक्ष म्हणून कोकीलवास, मदनाचा बाण म्हणून कामशर, कोकिळेचा लाडका म्हणून पिकवल्लभ, भुंग्यांचा प्रिय म्हणून भृङ्गाभीष्ट आणि अजूनही कितीतरी अर्थपूर्ण, काव्यमय नावे. एस्कीमोंच्या भाषेत म्हणे बर्फाला पन्नास नावे आहेत, तशी आपल्याकडे आंब्याला! पण सर्वाधिक नावे वसंत ऋतूशी जोडलेली!
महाकवी भारवीच्या कल्पनेत वसंत हा ऋतू नाहीच मुळी. वसंत आहे एक सुंदर स्त्री, वासंती, जिच्या हातात आंब्याची मोहोरलेली डहाळी आहे. तिचे पैंजण एकात एक गुंफलेल्या, सतत गुंजारव करणाऱ्या भ्रमरांचे आहेत. ही कल्पना मी जेव्हा वाचली तेव्हा मी चाटच पडले होते. ज्यांनी कुणी आंब्याचा मोहोर नीट बघितला असेल त्यांना माहिती असेल की आधी आंब्याच्या काळपट पोपटी टोकेरी पानांना मागे सारून आधी धीटपणे आंब्याच्या नाजुक पिवळ्या मंजिऱ्या पुढे येतात. आधी पिवळसर असलेल्या मंजिऱ्या काही दिवसांनी तांबूस सोनेरी होतात. सगळीकडे तो मंद, मादक सुवास पसरतो आणि कुणीतरी आवताण दिल्यासारखे इवले इवले काळे भुंगे त्या मंजिऱ्यांच्या आगेमागे रुंजी घालतात. भुंगे, इवल्या मधमाश्या आणि आंब्याचा मोहोर हे दृश्य आपण कैक वेळा पाहीले असेल पण भुंग्यांचे पैंजण घातलेली वसंत देवता ही कल्पना केवळ भारवी सारखा एखादा महाकवीच करू जाणे.
आंब्याचा मोहोर मला प्रचंड आवडतो. मागे एकदा पैठणला एक असाच चहुबाजूनी फुलांनी डवरलेला आंबा पाहिला होता. त्या आंब्याला इतका सुंदर मोहोर आला होता की झाडाला एक पान दिसत नव्हतं, सगळा सुंदर सोनेरी मोहोर! आणि वास तर नुसता घमघमत होता. आंब्याचा मोहोर फार काळ टिकत नाही. बघता बघता झाडाला गुंजेएवढी हिरवीगार फळे धरतात. त्यातली काहीच फक्त टिकतात, मोठी होतात, बरीचशी म्लान होऊन गळून पडतात. झाडाखाली कोमेजलेल्या, मऊ पडलेल्या, पिवळ्या चिमुकल्या कैऱ्यांचा खच पडतो. वाईट वाटतं खूप.
बघता बघता वसंत सरतो. होळी येऊन गेली की ग्रीष्माच्या झळा सुरु होतात. जीवाची उन्हाने नुसती काहिली होते, पण नेमक्या ह्याच वेळेला उन्हाळ्याच्या शापाला मिळालेल्या उ:शापासारख्या झाडावर उरलेल्या कैऱ्या मोठ्या होत जातात. त्यांचा गोल, हिरवा तजेलदार आकार खुणावायला लागतो. तशा कुठूनकुठून मंगळसूत्राच्या मण्यासारख्या काळ्याभोर लुकलुकत्या डोळ्यांच्या, झुपकेदार शेपट्यांच्या खारी येतात त्या कैऱ्यांचा वास लागून. आपल्या पाठीवरची रामाची बोटे ऐटीत मिरवत कैऱ्यांना दात लावतात.
खारींपाठोपाठ कैऱ्यांची चाहूल लागते ती मुलांना. मग दगड फेकून कच्च्या कैऱ्या पाडल्या जातात, आणि एकाघरचं मीठ, दुसऱ्याघरची मिरचीपूड, तिसऱ्याघरचं तेल घालून कैऱ्या कागदात दगडाने ठेचून चमचमीत करम बनवली जाते. आंबट तिखट अशी ती करम खाताना दात आंबतात, जीभ भाजते, पण खाणं काही कुणी सोडत नाही. आज इतकी वर्षं झाली तरी माझ्या बालपणातली ती करम आठवली की माझी जीभ खवळतेच अजून! आज शहरांमधून बेमौसमी कैऱ्या मिळतात. करम करायला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीही सहज हाताशी असतात, तरी ती करम पूर्वीसारखं तोंडाला पाणी का आणत नाही देवजाणे!
शेफाली वैद्य